'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर CM हसत..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कोट्यवधी रुपयांचा पाऊस..'

Shivaji Maharaj Statue Collapse: "हा पुतळा उभारताना भारतीय नौदलाचा सल्लाही ऐकला नाही. इंद्रजित सावंत हे इतिहासकार व कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनीही पुतळ्याच्या आणि एकंदरीत बांधकामाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या," असंही म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 28, 2024, 06:57 AM IST
'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर CM हसत..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कोट्यवधी रुपयांचा पाऊस..' title=
ठाकरेंच्या पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse: "नरेंद्र मोदी व त्यांचे भंपक लोक भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहेत, पण त्यांना सगळ्यांना मिळून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा धड बनवता आला नाही व सिंधुदुर्ग किल्ल्यावर भक्कमपणे उभारता आला नाही," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यावरुन टीकास्र सोडलं आहे. "फक्त आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान, शान कोसळून पडली," असं ठाकरेंच्या पक्षाने घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त करताना म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने यामागचा अर्थ आणि संकेत समजून घेतले पाहिजेत

"भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळ्याचे अनावरण केले गेले. तो पुतळा आज राहिलेला नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले. पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे. अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला. महाराष्ट्राच्या जनतेने यामागचा अर्थ आणि संकेत समजून घेतले पाहिजेत," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना...

"पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे. त्यांनी उभारलेले एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राममंदिर आणि नवे संसद भवन गळू लागले. सत्तर वर्षांतले हे पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वास्तू कोसळताना पाहत आहेत. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाच कोसळला. मुख्यमंत्री म्हणतात, जोरदार वारा, समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला. ते खोटे बोलत आहेत. बेफिकिरी, घाणेरडे राजकारण, ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारणीचे दिलेले काम व त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला," असा आरोप ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.

नक्की वाचा >> '3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा निवडणुकीला वापरला

"शिवरायांचा पुतळा कोसळल्याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी. हे महाशय सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री आहेत. याच पालकमंत्र्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकांपासून लोकसभा निवडणुकांपर्यंत कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडून मतदारांना विकत घेतले. हा पैसा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भ्रष्टाचारातून मिळाला व त्यात सिंधुदुर्गात कोसळून पडलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे बांधकामसुद्धा आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम या मंत्र्याने करून घेतले. कारण ठेकेदार त्यांचे व खास आणलेले अभियंतेही त्यांचे," असं लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

निर्लज्जपणाचा कळस

"भारतीय नौदलाचा सल्लाही ऐकला नाही. इंद्रजित सावंत हे इतिहासकार व कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनीही पुतळ्याच्या आणि एकंदरीत बांधकामाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या, काही सूचना केल्या होत्या, परंतु त्या फेटाळण्यात आल्या व पुतळय़ाचे अनावरण घाईघाईने उरकण्यात आले. ठाण्याच्या जयदीप आपटे या तरुण शिल्पकाराने हा पुतळा बनवला. 28 फूट उंचीचा हा असा भव्य ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यास साधारण तीन वर्षे लागतात, पण आपटे यांनी हा पुतळा फक्त सहा महिन्यांत बनवून सरकारच्या हवाली केला. दुसरे असे की, नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवलेली शिल्पे न निवडता आपटे यांनी स्वतःच बनवलेले एक शिल्प सरकारला सोपवले व त्याच्या मजबुतीची, सुरक्षेची कोणतीही शहानिशा न करता हे शिल्प सिंधुदुर्गातील राजकोटावर उभे केले गेले. या पुतळ्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली. ज्या 18 बोल्टच्या सहाय्याने पुतळा उभा केला ते 18 बोल्ट गंजले व पुतळाही विद्रूप झाला. तो पुतळा आता चौथऱ्यावरून कोसळून पडला व मुख्यमंत्री हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.