तासगावात भाजप नगराध्यक्षाच्या दालनात शिवसैनिकांची तोडफोड

शिवसेना आणि भाजपमधला वाद आता दिल्लीतून थेट गल्लीत पोहोचला आहे.

Updated: Jun 6, 2018, 05:49 PM IST

तासगाव : शिवसेना आणि भाजपमधला वाद आता दिल्लीतून थेट गल्लीत पोहोचला आहे. वारंवार मागणी करुनही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनात तोडफोड केलीय. खुर्च्या फेकून देत शिवसैनिकांनी भाजपच्या नगराध्यक्षाच्या दालनातील काचा फोडल्या. पालिका पुतळा बसवण्याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. ३० जुलैपर्यंत पुतळा बसवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. 

या तोडफोड प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी मात्र नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांना एकट्याला सोडून तिथून पळ काढला. शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.