अत्यल्प पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी संकटात

किमान ८० मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरण्या करु नयेत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Updated: Jul 5, 2019, 09:43 PM IST
अत्यल्प पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी संकटात title=

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड: जुलै महिन्याची ५ तारीख उलटली तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने नांदेड जिल्ह्यात पेरणीचे काम खोळंबले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ आठ टक्के पेरणी झाली आहे. ही पेरणीदेखील खरीप हंगाम निघून जाईल, या भीतीने केली आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने जोर पकडला आहे. मात्र, नांदेडवर अजूनही वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. परिणामी जुलैची ५ तारीख उलटूनही जिल्ह्यात सरासरी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही भागांमध्ये यापेक्षाही कमी पाऊस पडला आहे. 

त्यामुळे जमीन अजूनही भिजलेली नाही. तरीही काही शेतकरी वेळ निघून जाईल, या भीतीने पेरणी करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील ८ लाख हेक्टर पैकी अवघ्या ६७ हजार एकर म्हणजेच आठ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरणी करण्यासाठी घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ८० मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरण्या करु नयेत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. १० जुलै नंतर मुग आणि उडीदाची पेरणी करु नये, असेही कृषी विभागाने सांगितले आहे. परंतु, तरीही काही शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला पाऊस होईल, या आशेने पेरणी केली आहे. मात्र, यानंतरही पावसाने पाठ फिरवल्यास या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.