मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल (Hindus and Muslims) मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांचे (Muslims) पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हिंदू आहे. पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, समंजस मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. राष्ट्रहितास प्राधान्य देऊन त्यादिशेने अग्रेसर होण्याकरिता सर्वांना सोबत पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
मोहन भागवत म्हणाले की, भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हिंदूंचे कोणाशीही वैर नाही. ते म्हणाले, 'हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. इतर मतांचा तो अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाचा नाही तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.
मोहन भागवत म्हणाले, 'विदेशी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे. मुस्लिम समाजातील विवेकी नेतृत्वाने आततायी गोष्टींचा विरोध करायला हवा. कट्टरपंथीयांसमोर त्यांना आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. हे कार्य निरंतर करावे लागेल. आपल्या सर्वांसाठी हा खडतर परीक्षेचा काळ आहे. जेवढ्या लवकर आपण हे कार्य आरंभ करू, तितकेच आपल्या समाजाचे नुकसान आपण टाळू शकू. भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूंच्या स्वरूपात विराजमान होईल. युगानुयुगे आपण जड आणि चेतन या दोघांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहोत. हाच आमचा मूलभूत विचार असल्यामुळे आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही.
आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले की, भारत भविष्यात महाशक्ती होईल. महासत्ता म्हणून भारत कोणालाही धमकावणार नाही. राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र सर्वोच्च या परिसंवादात ते म्हणाले, 'हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा समानार्थी आहे. या संदर्भात आमच्यासाठी प्रत्येक भारतीय हिंदू आहे, मग तो त्याच्या धार्मिक, भाषिक आणि वांशिक प्रवृत्तीचा असो. ते म्हणाले की भारतीय संस्कृती विविध विचारांना सामावून घेते आणि इतर धर्मांचा आदर करते.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे कुलपती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन हेही सेमिनारमध्ये उपस्थित होते. या दरम्यान, आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, विश्वातील विविधतेला ज्या ज्या ठिकाणी बाधा निर्माण केली गेली, त्या सर्व ठिकाणी भयंकर संकटांना तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. याउलट ज्या ज्या ठिकाणी ही विविधता जपली गेली, तो समाज संपन्न असल्याचे आपण पाहू शकतो. भारतीय संस्कृतीत कुणालाही परके मानलेले नाही. कारण येथे सर्व समान आहेत. अधिक विविधता समृद्ध समाज निर्माण करते आणि भारतीय संस्कृती प्रत्येकाला समान मानते. सय्यद अता हसनेन म्हणाले की, मुस्लिम विचारवंतांनी भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.