नागपूर : आगामी वर्षात राज्यातले रेडिरेकनरचे भाव कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
जागांचे भाव कमी होऊन देखील रेडिरेकनरचे दर वाढत असल्याच्या मुद्द्यावर, शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया आणि नीलम गो-हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यामुळे बांधकाम क्षेत्र तसंच घरांचे भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जागेचे भाव कमी होत नसल्याबद्दल, विरोधकांबरोबर सत्ताधारी सदस्यांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली.
यावर रेडिरेकनरचे दर ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमली असली तरी सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि विश्वासात घेऊनच राज्यातले रेडिरेकनरचे दर ठरवण्यात येतील असं चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं.