Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा समाना करा करावा लागलेल्या महाविकास आघाडीकडून आता पराभावाची मरगळ झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. मात्र या निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाटाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा 'हिंदुत्वा'ची हाक दिली आहे. मात्र दुसरीकडे यावरुनच काँग्रेसच्या एका नेत्याने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना हिंदुत्वापासून शिवसेना दुरावल्याचा प्रचार खोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे आता काँग्रेस नाराज झाली असून त्याची झलक नुकत्याच बाबरीसंदर्भातील एका प्रकरणावरुन समोर आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीतील बिघाडीसाठी कारणीभूत ठरु शकतो. 2019 च्या नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर मविआची मोट बांधत सत्ता मिळवली. मात्र अडीच वर्षातच शिवसेना फुटल्याने मविआचं सरकार पडलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेल्यानंतरही ठाकरेंनी मविआ टिकवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा मविआमध्ये धुसपूस दिसून येत आहे. मविआने लढवलेल्या 280 पेक्षा जास्त जागांपैकी केवळ 49 जागांवर त्यांना विजय मिळवता आला आहे. ठाकरेंच्या सेनेला 20 तर काँग्रेसला 16 जागी विजय मिळवता आला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्याचा ठाकरेंना फटका बसल्याची चर्चा असतानाच आता स्थानिक निवडणुकांमध्ये हा मुद्दाच ठाकरेंनी आधी हाती घेतल्याची चर्चा आहे.
ठाकरेंच्या पक्षाने निवडणुकांच्या तयारीमध्येच शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. हिंदुत्वासाठी लढत राहणार, असे स्पष्ट केलं आहे. अशातच बाबरीचं पतन झालं त्या दिवशी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली. यावरुनच काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत वादाची ठिणी पडल्याचं दिसत आहे. बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला 6 डिसेंबरला 32 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नार्वेकरांनी या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट केली. मात्र या पोस्टवर काँग्रेस नेते रईस शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे.
रईस शेख यांनी नार्वेकरांची पोस्ट रिपोस्ट करत आक्षेप नोंदवलं आहे. “मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकीत – लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण करणं अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो," असं शेख यांनी म्हटलं आहे. यावरुन दोन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
This is to remind you that the @ShivSenaUBT_ party enjoyed enormous support from secular votes in the last two elections—Lok Sabha and Maharashtra Vidhan Sabha. The glorification of the dark day in India's history is uncalled for & unwarranted. I strongly condemn such kind of… https://t.co/RzNZzkx5wm
— Rais Shaikh (@rais_shk) December 6, 2024
आता यावर ठाकरेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.