'राष्ट्रवादीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी होती'

या मुद्द्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही

Updated: Nov 25, 2019, 03:41 PM IST
'राष्ट्रवादीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी होती' title=

कराड : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड केल्यानंतर आता शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाली, पण यावरून एकमत झालं नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीची होती असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यावरून मतभेद झाल्यामुळे अजित पवारांनी बंडखोरी केली का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर आम्ही दिलेली नाही, तर फडणवीसांनी अजित पवारांना दिली असेल असं राऊत यांचं म्हणणं आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा अजित पवार यांचा निर्णय व्यक्तिगत असल्याचं सांगत याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही आणि मुळात हे पक्षाचं धोरणंही नाही. अजित पवारांन असं का केलं माहिती नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. तसंच अजित पवारांच्या बंडामागे आपला हात नसल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

अजित पवारांच्या निर्णयाविषयी आपल्याला माहिती नसल्याचं म्हणत आतापर्यंतच्या पक्षाच्या बैठकीत, कार्यकारिणीच्या बैठकीतही अजित पवार उपस्थित होते. पण, त्यांचं धोरण बदलणं हा व्यक्तिगत निर्णय असल्याचं ते म्हणाले. मुळात या परिस्थितीमध्ये एका व्यक्तिपेक्षा पक्षाच्या निर्णयाला महत्त्वं असतं असा सूर पवार यांनी आळवला. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना पवारांना या कृत्याबद्दल पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईला सामोरं जावं लागणा का, असा प्रश्न केला असता याविषयीचा निर्णय पक्ष घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.