Shivsena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतं नाव आणि चिन्हं मिळणार याबाबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नाव दिलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह देखील जाहीर केलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिलं असून तीन चिन्ह देण्यास सांगितलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे', असं नाव देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मशाल हे चिन्हं देखील मिळालं आहे. मशाल या चिन्हाचं शिवसेनेशी जुनं नातं असल्याचं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितल आहे.
"औरंगाबादमध्ये 1989 मध्ये शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे याच चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही", असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.1985 साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक!
1988 मध्ये शिवसेनेनं धनुष्य बाण या चिन्हावर निवडणुका लढवल्या होत्या. मात्र तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मोरेश्वर सावे यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. मशाल या चिन्हावर सावे अपक्ष म्हणून निवडून आले आणि शिवसेनेला पाठिंबा दिला.