मुंबई : दिवंगत वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील सरकार, त्यांनी केलेली विकासकामे आणि विकास यावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण, महाराष्ट्रातील बेशिस्त, भ्रष्ट्र आणि मंत्र्याची दरोडेखोरी, गफले घोटाळे यावर मुख्यमंत्री काय बोलणार? त्यांच्याकडे बोलण्यासारखे नाही नसल्यामुळेच त्यांनी नेहमीचेच मुद्दे भाषणात मांडले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
साधे एक ट्विट नाही...हि तर लाचारी...
दिवंगत बाळासाहेबांना आम्ही अभिमानाने अभिवादन करतो. पण, ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत बसला आहात. त्यांचे नेते सोनिया, राहुल, प्रियांका गांधी यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त साधे एक ट्विट केले नाही. त्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून आपण सत्ता भोगत आहात यापेक्षा मोठी लाचारी कोणती? असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात समस्या, विकास कामे यांचा उल्लेख नाही. त्यावर ते काय बोलणार? आपल्याकडे अजेंडा नाही म्हणून जुने हे उकरून वाद विवाद सुरु ठेवण्याचे उद्योग करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजप स्वतःच्या भरवश्यावर आपले सरकार बनवेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेची लाट कुठे घसरली?
१९९२ साली शिवसेनेची लाट होती. त्यावेळी शिवसेनेला जनमत होते असे ठाकरे म्हणतात. पण, १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये १८० जागांवर शिवसेना लढली त्यापैकी १७९ जागांवर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतरही तेथील जनतेने शिवसेनेला नाकारले. राम मंदिरच्या वादात कुणी सहभाग घेतला होता हे जनतेला माहित आहे. त्यामुळेच तेथील जनतेने शिवसेनेला नाकारले होते. आताही तेच होणार आहे असे त्यांनी सांगितले.