Maharashtra Politics : महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदावर बसवायचंय असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण असणार या चर्चांना उधाण आलयं. देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानी यांना मिळाला होता. त्यानंतर काही राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा सुरु झाली. पण त्यासाठी पात्र कोण असाही प्रश्न विचारला जात आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले हे विधान अत्यंत विचारपूर्वक केलेले असावे मानले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण असतील याबाबतही तर्क लावले जात आहे. यामध्ये पक्षातील लोकांना संधी दिली जाईल की बाहेरच्यांना अशीही चर्चा सुरु आहे. सुप्रीया सुळे, रश्मी ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह पंकजा मुंडे यांची नावे महिला मुख्यमंत्री पदासाठीच्या शर्यतीत आहेत. यासोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule)
कायमच उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या बारातमीच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा आता सुरु झाल्या आहेत. सुप्रिया सुळे या सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र राज्यात सत्ता येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायमच मित्रपक्षाची भूमिका घेतल्याने कमी जागा मिळत आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी किती जागा निवडून आणते यावरुन सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री पदी बसणार की नाही हे ठरणार आहे. ठाकरे गट सध्या कमकुवत असल्याने महाविकास आघाडीत राष्ट्रवादीची बाजू मजबूत आहे.
रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)
ठाकरे गटाकडून उमेदवार द्यायचा झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याही नावाची आता चर्चा सुरु झालीय. रश्मी ठाकरेही राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर रश्मी ठाकरे या त्यांची समजूत घालण्यासाठी मैदानात उतरणार होत्या अशी चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले जाऊ शकते
पंकजा मुंडे (Pankaja Munde)
ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत. वेळोवेळी पंकजा मुंडे यांना भाजपकडून सातत्याने डावललं जाते असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी हा दावा नाकारत कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे. मात्र स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत देशपातळीवरील राजकारणात पंकज मुंडे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात भाजपकडून टाकली जाण्याची शक्यता आहे.
यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)
यशोमती ठाकूर या तीनदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत जवळीक असलेल्या म्हणून यशोमती ठाकूर यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत असते. त्यामुळेच यशोमती ठाकूर देखील कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे (sushma andhare)
ठाकरे गटाच्या आल्यापासून सुषमा अंधारे पुन्हा एकदा आक्रमपणे विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियांची काहीप्रमाणात दखल घ्यावी लागत आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेची आक्रमपणे भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आहेत. त्यामुळे त्यांच्याही नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरु आहे.