मुंबई : एका बलात्कार पीडित तेरा वर्षांच्या मुलीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. बाळाची आणि बाळाच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचं कळतयं.
दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या मुलीच्या जिवाला धोका असल्याने 'टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' म्हणजेच गर्भपात करण्याची संमती डॉक्टरांना दिली होती.
एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, गर्भपात करत असताना डॉक्टरांना जाणवले की मुलीच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सिजेरियन करत बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.
या पीडित मुलीने १.८ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे.
Mumbai: After SC order allowing 13-yr-old rape victim to terminate her 31- week old pregnancy, doctors tried to terminate her pregnancy 1/2
— ANI (@ANI) September 8, 2017
रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनी माहिती दिली की, बाळाची प्रकृती स्थिर असून देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे.
Mumbai: Doctors decided it was risky for her life as it was 31st week of pregnancy and decided to perform a cesarean delivery 2/2
— ANI (@ANI) September 8, 2017
या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांच्या बिझनेस पार्टनरने सात महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तर, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्टनुसार गर्भपात करण्यात यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करण्यास बंदी आहे. त्यामुळेच पीडिताच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लैंगिक अत्याचारामुळे या मुलीवर झालेला मानसिक त्रास आणि सध्या तिला होत असलेल्या वेदना पाहता मुदतपूर्व प्रसूती करण्याची परवानगी देणे आम्हाला योग्य वाटत आहे असे न्यायालयाने म्हटले होते.
त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने गर्भात करण्याची परवानगी दिली होती.