आदित्य ठाकरेंना मिळणार सेनेच्या नेतेपदी बढती?

उद्धव ठाकरे यांची येत्या २३ जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे. याच दिवशी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही नेते पदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे... तर नेते पदावर वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणीही सुरु झालीय. 

Updated: Dec 22, 2017, 08:56 PM IST
आदित्य ठाकरेंना मिळणार सेनेच्या नेतेपदी बढती?   title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : उद्धव ठाकरे यांची येत्या २३ जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे. याच दिवशी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही नेते पदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे... तर नेते पदावर वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणीही सुरु झालीय. 

अंतर्गत निवडणूक

शिवसेनेचा अंतर्गत निवडणूक कार्यक्रम घोषित झालाय. पक्षात नेतेपदासाठी चुरस निर्माण झालीय. पक्षाच्या नेते पदावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसंच ठाण्यात प्रत्येक निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देणारे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचंही नेते पदासाठी नाव आघाडीवर आहे. नेतेपदासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांगही आहे.

पदासाठी चढाओढ

त्यामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गिते, लोकसभा शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद शिवसेना मुख्य प्रतोद डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद शिवसेना गटनेते अॅड. अनिल परब यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. 

आपली नेते पदावर वर्णी लागणार नसेल तर दुसऱ्या प्रबळ दावेदाराचा पत्ता कापण्यासाठीही पक्षात जोरात मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या पक्षात आठ नेते आहेत. त्यामध्ये डॉ. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे.

वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळं मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांच्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक नेते असं पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे... तर अन्य नेते त्यांच्या पदावर कायम राहतील असं सांगितलं जातेय.
पक्षाच्या प्रथा परंपरेनुसार शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव यांची फेरनिवड बिनविरोध होईल, हे निश्चित आहे.

पक्षप्रमुखांच्या नाकी नऊ...

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेत्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षात सल्लागार म्हणून नवरत्न आहेत. या नवरत्नांमध्ये असलेली चुरस लक्षात घेता त्यांच्यापैकी कुणाची नेते पदी वर्णी लावताना उद्धव ठाकरेंची नाकी नऊ येणं स्वाभाविक आहे