मुंबई : मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.
मनसेच्या नगरसेवकांना दिलेल्या ऑफरमध्ये पैशांची देवाण घेवाण झाल्याचा एसीबीला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ६ पैकी २ नगरसेवकांवर कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती एसीबी सूत्रांनी दिलीये. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे यांच्याविरोधात गुप्त चौकशीत एसीबीला माहिती मिळालीये. त्यामुळे लांडे, कदम यांच्याविरोधात कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो.
एसीबीच्या एका बड्या अधिका-याने नाव घेण्याच्या अटीवर बातमीला दुजोरा दिलाय. तर इतर चार नगरसेवकांच्या गुप्त चौकशीत विशेष काही आढळलं नसून गरज पडल्यास त्यांची उघड चौकशी केली जाईल असंही एसीबीने स्पष्ट केलय.
मनसेतून सेनेत जाण्याकरता ६ नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत मोठा घोडेबाजार झाल्याची खासदार किरीट सोमाया आणि मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी केली होती. या तक्रारींवर देखील एसीबी चौकशी सुरु केली असून मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी दिलेली लेखी तक्रार हाच संजय तुर्डेंचा जबाब म्हणून एसीबीने दाखल करुन घेतला असून, यातक्रारीनुसार नगरसेवक दिलीप लांडे यांची लवकरच चौकशी केली जाईल असंही एसीबीने स्पष्ट केलय. कारण “सेनेत आल्यावर फायदा होईल, त्याकरता आर्थिक उलाढाली होतील” अशाप्रकार पैशांची ऑफर दिलीप लांडे यांनी दिली होती असं तुर्डेंनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.