मुंबई : रविवारपासून मुंबईची मोनो रेल पुन्हा एकदा या शहराच्या सेवेत रुजू झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बंद असणारी ही मोनो पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्यामुळं रेल्वेवरील ताण काही अंशी कमी होणार असल्याचं चित्र आहे. ही सेवा पुन्हा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही सेवा पुन्हा एकदा सुरु झाली. चेंबूर ते जेकब सर्कल या अंतरात ही मोनो पुन्हा धावणार आहे. तर, वर्सोवा-अंधेकी- घाटकोपर मार्गावर चालणारी मेट्रो सेवा सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं आता मुंबईतील सार्वजनिक वाहतून पुन्हा वेग पकडत असल्याचं चित्र आहे.
२२ मार्चला देशव्यापी टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेचच या सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर आता थेट ऑक्टोबर महिन्यात त्या प्रवाशांच्यासेवेत रुजू होत आहेत.
मोनो रेल सुरु झाली असली, तरीही यामध्ये प्रवास करण्यासाठी कोरोनासाठी आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. विनामास्क कोणत्याही प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. शिवाय सुरक्षित फिजिकल डिस्टंस राखण्यासोबतच इतरही सुरक्षेचे निकष पाळण्यासाठी प्रवाशांनी मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन सदर सेवेतर्फे करण्यात आलं आहे.
मोनोरेलनं प्रवास करण्यासाठीचे नियम
- आरोग्य सेतू ऍपवर सुरक्षित अथवा सेफ स्टेटस असणाऱ्याच प्रवाशांना प्रवासाची मुभा.
- विनामास्क प्रवासास अनुमती नाही. मास्क योग्य त्या पद्धतीनंच घातलेला असवा.
- सुरक्षित फिजिकल डिस्टंस राखत प्रवास करावा.
- मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे निकष पाळण्यासाठी पूर्ण सहकार्य करावं.
- तिकीट स्कॅनिंगसाठी कॉन्टॅक्टलेस क्यूआर कोड स्कॅनिंग प्रणालीचा वापर करावा.