मुंबई: माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे उद्विग्न होऊन अजित पवार यांनी राजीनामा दिला, असा दावा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याविषयी आता शंका निर्माण झाली आहे. कारण, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच पार्थ पवार प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. त्यांच्या देहबोलीतही फार तणाव जाणवत होता. मात्र, अजित पवार राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
यावेळी शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेतील वक्तव्याचा दाखला दिला असता, 'आमचं वेगळं बोलणं झालं होतं', असे पार्थ यांनी म्हटले. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, मी उद्या तुम्हाला भेटेन, असेही ते बोलून गेले. त्यामुळे आता उद्या अजित पवार आणि पार्थ पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तत्पूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी कुटुंबप्रमुख या नात्याने अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. आमच्या कुटुंबात कोणताही विसंवाद नाही. आजपर्यंत आमच्या कुटुंबात माझा शब्द नेहमी अंतिम राहिला आहे. त्यामुळे मी अजित पवारांना त्यांच्यावरील पक्षाच्या आणि राष्ट्रीय जबाबदारीचे स्मरण करून द्यायचा प्रयत्न करेन, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
मात्र, शरद पवार यांच्या शब्दाला कुटुंबीयांमध्ये इतकी किंमत असेल तर अजित पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी साधी चर्चाही का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी आज आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी काकांवर (शरद पवार) गुन्हा दाखल झाल्याने आपण अस्वस्थ झाल्याचे म्हटले. सध्याच्या राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आपण यामधून बाहेर पडलेले बरे, त्याऐवजी आपण शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी पार्थला सांगितल्याचे समजते.