बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

Updated: Jul 18, 2017, 07:58 PM IST
बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार title=

मुंबई : गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

मुंबईतील बेस्ट सेवेचं चाक सध्या आर्थिक अडचणीच्या चिखलात रुतून बसलंय. आपल्या कर्मचा-यांचा पगार वेळेवर देण्याइतकीही बेस्टची पत उरलेली नाही. गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचा-यांचे पगार वेळेवर होत नाहीयत. पगारापोटी दरमहा द्यावे लागणारे ८० कोटी रूपये जमवताना बेस्ट प्रशासनाच्या नाकी नऊ येतायत. या पार्श्वभूमीवर बेस्टमधील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन, बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती स्थापन केलीय. त्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बेस्टचे कर्मचारी हे मुंबई महापालिकेचे कर्मचारी असून त्यांचे पगार देण्याची जबाबदारी महापालिकेनं स्वीकारावी. कराराप्रमाणं वेळेवर पगार करावेत. कॅनडा ड्यूटी शेड्यूल रद्द करावं. प्रलंबित वेतन करार मार्गी लावावेत, अशा मागण्या बेस्ट कर्मचा-यांनी केल्यात. या मागण्यांसाठी संप करावा की नाही, यासाठी संघटनांनी मंगळवारी चक्क बेस्ट कर्मचा-यांचं मतदान घेतले. त्याचा निकाल बुधवारी लागणार आहे.

सध्या बेस्टचा तोटा २ हजार कोटी रुपयांवर पोहचलाय. दर महिन्याला त्यात १०० कोटी रुपयांची भर पडतेय. बेस्टनं तोटा कमी करण्यासाठी तोट्यातील एसी बसेस बंद केल्या. आता अधिका-यांचे भत्ते, विविध घटकांना दिल्या जाणा-या पास सवलतीही बंद करण्याचा विचार सुरू आहे. मुंबई महापालिका आणि बेस्टचं बजेट एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
बेस्टला सावरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेनं केलाय. दरम्यान, एकेकाळी आपल्या नावाप्रमाणेच बेस्ट असलेली मुंबईतली ही सार्वजनिक वाहतूक सेवा सध्या कोलमडून पडलीय. तिला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर बेस्ट प्रशासनाला आणि महापालिकेला कठोर उपाय आखावे लागतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.