मुंबई: राज्यभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले. यापैकी यवताळमध्ये एक, मुंबईत तीन आणि नवी मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
साबण, सॅनिटायझरच नव्हे, तर लिंबानेही रोखता येऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि मॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धार्मिक यात्रा, उत्सव आणि मेळावे रद्द करण्यात आले आहेत.
कोरोना : कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्वारांटाईन सेंटरमध्ये अपुरी सुविधा