मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत याबद्दल माहिती दिली. सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे, असा खोचक टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी ते कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचेही संकेतही फडणवीस यांनी दिले.
'स्वत:ची थिअरी सिद्ध करायला पवारांकडून वेगळ्या चौकशीचा घाट'
यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. आतापर्यंतची कामगिरी पाहता सरकारला अजून सूर गवसलेला दिसत नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत काहीही मदत मिळालेली नाही. ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. आम्ही या सगळ्या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारू, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच भाजपच्या काळातील निर्णय रद्द केल्याबद्दही फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीकेची तोफ डागली. सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे. जलयुक्त शिवार योजना सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. विद्यमान सरकार जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.