मुंबई : मुंबईतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यालयाबाहेर फेरीवाल्यांना बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मनसेच्या दादरमधल्या राजगड या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार आहेत.
राजगड हे कार्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्वेअरपर्यंतच्या पदपथांवर १०० फेरीवाले बसवले जाणार आहेत. मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयाच्या आदेशानुसार पावले उचलली आहेत. त्यानुसार प्रथम केलेल्या फेरीवाला क्षेत्राला लोकांच्या झालेल्या विरोधानंतर सुधारीत यादी तयार करण्यात आली आहे.
या सुधारीत यादीनुसार महापालिकेने विविध विभागातील फेरीवाला क्षेत्रातील पदपथांवर एक बाय एक आकाराच्या जागा रंगवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दादर, माहिम आणि दादर या जी/उत्तर विभागामध्ये १४ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या १४ रस्त्यांवर १ हजार ४८५ फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.
महानगरपालिकेची ही मनमानी आहे. निवासी जागेत फेरीवाले बसवू देणार नाही. मनसे याला विरोध करेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.