तुमची ED आमची BMC! भाजप नेते मोहित कंबोज बीएमसीच्या निशाण्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई पालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे  

Updated: Mar 23, 2022, 02:36 PM IST
तुमची ED आमची BMC! भाजप नेते मोहित कंबोज बीएमसीच्या निशाण्यावर title=

मुंबई : महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. त्यानंतर आता शिवसेनेही भाजप नेत्यांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी (Illegal Construction) भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या घरी धडकले. 

कंबोज यांच्या सांताक्रूझ इथल्या घरी अधिकारी चौकशीसाठी दाखल झालेत.  पाच आधिकऱ्यांची टीम चौकशीसाठी पोहोचली आहे. घरात किती बेकायदेशीर बांधकाम केलं आहे, याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पालिकेकडून कारवाई होऊ शकते असं बोललं जात आहे. 

कारवाईला घाबरत नाही
मात्र असल्या कारवाईला आपण घाबरत नाही असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. पालिका अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं आहे. पालिका अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यांनी नोटीस पाठवावी, आपण नोटीसीला उत्तर देऊ, असंही कंबोज यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान आज सकाळी ट्विट करत मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना आवाहन दिलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मी तुम्हा दोघांनाही घाबरत नाही. माझं जे करायचंय ते करा, खोट्या केसेस करायच्या असतील तर करा, कितीही नोटीस पाठव, पण माझा संघर्ष सुरुच राहिल, असं कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.