सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.

आकाश नेटके | Updated: Jan 8, 2024, 01:50 PM IST
सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय title=

Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच सासू ही सुनेचे वडील आणि भावाविरुद्ध घरगुती हिंसाचार कायदा, 2005 अंतर्गत खटला चालवू शकत नाही. सासू तिच्या सुनेविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करू शकते पण सुनेच्या कुटुंबाविरुद्ध नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 अंतर्गत ते न्याय्य आहे. पण हा कायदा मुलीचे वडील आणि भावाविरुद्ध न्याययोग्य नाही, असेही कोर्टानं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या नेतृत्वाखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका प्रकरणात वडील, मुलगा आणि त्यांची मुलगी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. मुलीच्या सासूने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तिघांवरही घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत खटला चालवला जात होता. मुलीचे वडील आणि भाऊ यांनी सातारा दंडाधिकारी यांची तक्रार आणि नोव्हेंबर 2018 चे समन्स रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुलीने मे 2016 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर मुलीने तिचा पती आणि कुटुंबीयांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटलं होतं.

मुलीने डिसेंबर 2017 मध्ये तिचा पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. मात्र तिच्या सासूनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मुलीचे वकील सुशील उपाध्याय म्हणाले की पक्षांमध्ये कधीही सामायिक कौटुंबिक संबंध नव्हते आणि माझ्या अशिलाविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार करता येत नाही. दुसरीकडे, मुलीचे वडील आणि तिच्या भावाने माझ्या मुलाला त्यांच्यासोबत राहण्याचा आग्रह धरला आणि त्याला धमक्या दिल्याचा आरोप सासूने केला आहे. मात्र कोर्टाने या तक्रारी दोघांना घरगुती हिंसाचार या व्याख्येखाली आणत नाहीत. वडील आणि भावाकडून केवळ धमक्या आणि हिंसाचाराचे आरोप त्यांना कायद्यांतर्गत खटला चालवण्यास जबाबदार बनवण्यासाठी पुरेसे नाहीत, असे म्हटलं आहे.

त्यामुळे न्यायमूर्ती गोखले यांनी वडील आणि भावाविरुद्धची तक्रार फेटाळून लावली आणि त्यांच्याविरुद्धचे समन्स रद्द केले. मुलगी आणि तिची सासू किती काळ एकाच घरात राहत होत्या या तक्रारीत सूचित होत नसले तरी काही काळ संयुक्त कुटुंबातही राहत होते. कौटुंबिक हिंसाचार  लक्षात घेऊन मुलगी प्रतिवादीच्या व्याख्येत येईल. त्यामुळे सासूने मुलीविरुद्ध केलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार निकषांच्या अधीन आहे.

कोर्टानं काय म्हटलं?

"मुलीचे वडील आणि भावाचे तिच्या सासूशी कधीच घरगुती संबंध नव्हते, असे या तक्रारीत स्पष्ट झाले आहे. मात्र सासूने दावा केला की मुलीचे वडील तिच्या पतीचे चुलत भाऊ होते आणि म्हणून लग्नानंतर तिच्यासोबत संबंधित होते. त्यामुळे संपूर्ण तक्रारीवरून स्पष्टपणे दिसून येते की या याचिकाकर्त्यांवर केलेले आरोप हे त्यांच्या वैवाहिक संबंधातून नाहीत. या याचिकाकर्त्यांना घरगुती नात्यात बसवण्याचा सासू-सासऱ्यांचा प्रयत्न  अयशस्वी ठरला आहे," असे न्यायमूर्ती गोखलेंनी म्हटलं आहे.