Good News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी

CIDCO Mass Housing Scheme 2022 : सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीतील अर्जदारांसाठी सामुहिक गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. एकूण 4869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.

Updated: Jan 26, 2024, 08:48 AM IST
Good News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी title=

Navi Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी  2022 मधील बामणडोंगरी घरांच्या किंमती सहा लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यशस्वी अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या लाभासह अंदाजे 27 लाखांत मिळणार सिडकोची घरे मिळणार आहेत. त्यामुळे आता बामणडोंगरी येथील लाभार्थ्यांना 27 लाखात घराचा ताबा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बामणडोंगरी, उलवे, नवी मुंबई येथील घरांच्या किंमती सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यामुळे 35 लाख 30 हजाराचे घर आता 29 लाख 50 हजार या किंमतीला मिळणार आहे. 

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (CIDEO) सामूहिक गृहनिर्माण योजना दिवाळी-2022 अंतर्गत बामणडोंगरी, उलवे येथील घरांच्या किमती कमी केल्या आहेत. सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) वर्गातील अर्जदारांसाठी ही योजना सुरू केली होती. 17 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेसाठी ड्रॉ काढण्यात आला होता. यात एकूण 4,869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर कित्येक महिने घरांच्या किमती परवडत नसल्याने विजेत्यांकडे घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत.

सिडकोने नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये गृहनिर्माण योजना विकसित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न नियोजन सिडकोने पूर्ण केले आहे. गेल्यावर्षी 17 फेब्रुवारी रोजी लॉटरी काढण्यात आली होती. त्यानंतर विजेत्या अर्जदारांना इरादापत्रे पाठवण्यात आली. याप्रक्रियेनंतर अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सध्या अंतिम टप्यामध्ये आहे. यामुळे लवकरच अर्जदारांना घरांचा ताबा मिळणार आहे.  

त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, मूळ किंमत 35.30 लाख असलेली घरे आता 29.50 लाखांच्या किमतीत उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल अर्जदारांसाठी पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत उपलब्ध असलेल्या 2.5 लाख अनुदानाचा लाभ मिळाल्यानंतर, ही घरे लाभार्थ्यांना 27 लाखांच्या किमतीत मिळणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

"सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 मधील बामणडोंगरी येथील यशस्वी अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्पन्न मर्यादा रू. 3 लाखापर्यंत असल्याने घरासाठी रु. 35 लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन या अर्जदारांना दिलासा देण्याकरिता बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किंमती कमी करण्याबाबतचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 मधील बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किंमती  6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सदर योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे," असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी म्हटलं आहे.