शिंदे-फडणवीस-ठाकरे प्रथमच एकत्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं नवनिर्माण?

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित मनसेच्या दीपोत्सवात (Mns) या महायुतीची पहिली झलक पाहायला मिळाली. 

Updated: Oct 21, 2022, 11:21 PM IST
 शिंदे-फडणवीस-ठाकरे प्रथमच एकत्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं नवनिर्माण? title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत (Bmc Election 2022) महायुती होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित मनसेच्या दीपोत्सवात (Mns) या महायुतीची पहिली झलक पाहायला मिळाली. नक्की कशी असेल ही महायुती हे सविस्तर जाणून घेऊयात. (cm eknath shinde dcm devendra fadnavis and mns raj thackeray inauguration dipotsav at shivaji park dadar)

मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातले 3 बडे नेते. शिवाजी पार्कवर मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र दिसले. तिघांनीही रिमोट कंट्रोल दाबून दीपोत्सवाचं उद्घाटन केलं.

शिवाजी पार्कचा अवघा परिसर विद्युत रोषणाईच्या झगमगाटानं झळाळून गेला. त्याआधी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन शिंदे-फडणवीसांनी ठाकरेंच्या घरचा पाहुणचारही घेतला. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं मानलं जातंय. 

मुंबई जिंकण्यासाठी 'महायुती'चे संकेत?

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तीन पक्षांचा सध्या एकच अजेंडा आहे. हा अजेंडा म्हणजे उद्धव ठाकरेंना असलेला विरोध. हाच धागा पकडून गेल्या काही दिवसांत शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंचं चांगलंच मेतकूट जमलंय.गणेशोत्सव काळात शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकमेकांच्या घरी गेले, भेटीगाठी वाढल्या. 

अलिकडेच राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राचा मान ठेवत, अंधेरी पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी महायुतीचं नवनिर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. 

राजकारणात दुश्मन का दुश्मन दोस्त अशी म्हण आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'एक से भले दो आणि दो से भले तीन' असं चित्र दिसतंय .तर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला काँटे की टक्कर देण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसे महायुती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.