आज महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता पण...

'हीरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं होतं, पण नाईलाज आहे'

Updated: May 1, 2020, 01:38 PM IST
आज महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता पण... title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राला अशीच मिळाली नाही, त्यासाठी अनेकांनी लढा दिला आहे. महाराष्ट्रासाठी लढलेल्या लढ्यातील सर्वांना माझा मानाचा मुजरा असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त आज हुतात्मा चौकावर गेल्यावर शहारे आले होते. आजपर्यंत अनेकदा हुतात्मा चौाकात गेलो होतो. मात्र आज मुख्यमंत्री म्हणून त्यांना वंदन करत होतो, त्यामुळे वेगळ्या भावना होत्या. यावेळी सगळा जुना काळ आठवला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितलं.

यंदा महाराष्ट्र दिन हीरक महोत्सव साजरा करत आहे. हीरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचं ठरवलं होतं, पण नाईलाज आहे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा हा काळही नक्की जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्याच्या पराक्रमाच्या गाथा मोठ्या आहेत. महाराष्ट्र बदलला नाही. तो तसाच आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. आपला महाराष्ट्र लढवय्या आहे. औरंगजेबालाही समजलं महाराष्ट्र असा तसा नाही, 27 वर्ष तो लढला, मात्र त्याला मात करता आली नाही. महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. महाराष्ट्राला लढवय्यांची परंपरा असल्याचं सांगत प्रत्येक जण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र,यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. महाराष्ट्रदिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला.

मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण करण्यात आलं. तर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन केलं.