...अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अधिकृत आमदार होणार

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर दुपारी एक वाजता विधानभवनात  या सदस्यांना शपथ देतील.

Updated: May 17, 2020, 07:55 PM IST
...अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अधिकृत आमदार होणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांना सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उद्यापासून अधिकृत आमदार होतील. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर दुपारी एक वाजता विधानभवनात  या सदस्यांना शपथ देतील.
 
या नऊ सदस्यांमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या २४ एप्रिल २०२० रोजी ९ जागा रिक्त झाल्या होत्या. कोरानामुळे खरंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने पुढे ढकललेली ही निवडणूक लवकर घ्यावी, अशी विनंती महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्याचबरोबर राज्यपालांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाला ही निवडणूक घेण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ मे रोजी या नऊ जागांसाठी मतदान घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, नऊ जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती.

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती आमदार म्हणून विधिमंडळात प्रवेश करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय जीवनात एकदाही निवडणूक लढवली नव्हती. बाहेर राहून रिमोट कंट्रोलने कारभार चालवायचा ही शिवसेनेची कार्यपद्धती होती. मात्र, गेल्यावर्षी आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक जिंकून हा पायंडा मोडीत काढला. यानंतर आता उद्धव ठाकरे हेदेखील आमदार होत असल्याने ठाकरे घराण्यातील दोन व्यक्ती एकाचवेळी विधिमंडळाचे सदस्य असण्याचा एक वेगळाच इतिहास नोंदवला जाईल.