मुंबई : काँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, अभय मालप, आणि योगेश चिलेंसह अन्य साथीदारांना पुढील कारवाईसाठी आता काहीवेळात किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना मुबंई पोलिसांनी त्यांच्या शिवाजी पार्कमधील जनसंपर्क कार्यालयातून ताब्यात घेतलं आणि कफ परेड पोलीस ठाण्यात ठेवलं होतं. त्यानंतर गुन्हा घडला त्या हद्दीतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आलं.
धुरी, मालप आणि चिले यांच्यासह अन्य साथीदार आरोपी त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाले. हल्ल्यानंतर देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यामुळे मनसे विरुद्ध मुंबई काँग्रेस विशेषतः अध्यक्ष संजय निरुपम हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.
निरुपम यांनी या घटनेला भ्याड हल्ला म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीनं कठोर कारवाईची मागणी केलीय. तसं न झाल्यास तेवढ्याच ताकदीनं प्रत्त्युत्तर देण्याचा धमकी वजा इशाराही निरुपम यांनी दिलाय.
निरुपम तोडफोड करण्यात आलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयाची पाहाणी करणार आहेत. कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर किल्ला कोर्ट असल्यानं आणि तिथे हल्ल्यातील मनसे आरोपींना हजर केले जाण्याची शक्यता असल्यानं तणावाचं वातावरण आहे.