मुंबई : आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.
दरम्यान, केंद्राच्या सूचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर कोरोनावर आपण मात करु शकतो. तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाऊनचा कालावधी नाईलाजाने तीन आठवड्यांसाठी वाढवावा लागला आहे. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली पाहिजे. तरच परिस्थितीत बदल होईल. दुसरीकडे नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही, असे शरद पवार म्हणालेत. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या, अजिबात बाहेर पडू नका, असे आवाहन करताना मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज कोरोनाची संख्या वाढत आहे. जगात कोरोनाचा फैलाव होत आहे. असे असताना इतर देशांशी तुलना करण्याची गरज नाही. राज्यात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी नियम कठोर केले पाहिजेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अमेरिकेसारख्या देशातही आज मृत्यू झालेल्यांची संख्या ४० हजारांच्यावर आहे. स्पेनमध्येही ही संख्या २० हजारांवर तर फ्रान्समध्येही ही संख्या १९ हजारांच्या वर आहेत. काही देश पाहिले तर त्यांचा आकार महाराष्ट्राएवढा आहे. त्या ठिकाणची मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. आपल्याला पाश्चिमात्य देशांची तुलना करून चालणार नाही, असेही ते म्हणालेत.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार बंद आहेत. याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. देशातला आणि राज्यातला आकडा चिंताजनक आहे. जे लोक कोरोनाशी सामना करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आत्मियता दाखवणे आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण आहोत, हे आपण त्यांना पटवून दिले पाहिजे. सर्वच यंत्रणा चांगले काम करत आहेत. पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका दिवसरात्र मेहनत करीत आहेत, त्यांचे बळ वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. घरातच राहिले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे, असे पवार म्हणालेत.