सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत महत्त्वाची बातमी

Updated: Oct 19, 2020, 12:53 PM IST
सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मेट्रो आणि मोनो रेल अशा दोन्ही सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर आता धीम्या गतीनं रुळावर येणाऱ्या मुंबईच्या लोकल सेवेला गती कधी मिळणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे. यातच आता अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

सरसकट महिलांसाठी लोकल सेवा सुरू होण्या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी १७ ऑक्टोबरपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहलं होतं. 

रेल्वे बोर्डाकडून परवानगी आणि प्रवाशी संख्या किती राहील या बाबत चर्चा करून निर्णय घेऊ याबाबत पश्चिम रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोरराजे निंबाळकर यांना पत्र पाठवलं होतं. त्याचसंदर्भात सोमवारी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांची चर्चा होऊन महिलांसाठी लोकल सुरू होण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

दरम्यान, सरसकट सर्व महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याच्या निर्णयामध्ये दिरंगाई होत असल्यामुळं महिला वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासासाठी मोर्चे काढू तसेच रस्त्यावर उतरु, असा इशारा महिला प्रवाशांनी दिला आहे. बस आणि रिक्षाने प्रवासात अधिक पैसे मोजावे लागतात असं सांगत केंद्रानंही आता लवकरात लवकर सर्वसामान्य महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरु करावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.