शिवसेनेनं बेईमानी केली, आम्ही त्यांना जागा दाखवली - देवेंद्र फडणवीस

केवळ चार जागांकरता शिवसेनेने युती तोडली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

Updated: Nov 16, 2022, 06:44 PM IST
शिवसेनेनं बेईमानी केली, आम्ही त्यांना जागा दाखवली - देवेंद्र फडणवीस title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : शिवसेनेसोबत (Shivsena) युती तुटल्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार येण्यापासून ते ठाकरे सरकार कोसळ्यापर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपच्या (BJP) निशाण्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेला शब्द पाळला नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी वारंवार भाजप हल्ला चढवला होता. यावरुन आरोप प्रत्यारोपही झाली. त्यांनतर आता पुन्हा शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेच आलं आहे. यानंतरही आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर आरोप सुरुच ठेवले आहेत. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'विचार पुष्प' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. (Devendra Fadnavis reply to Uddhav Thackeray on criticism of Amit Shah)

"आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. केवळ चार जागांकरता शिवसेनेने युती तोडली. युती तोडल्यानंतर 118 जागांवर लढणारा भाजप एका दिवसात 288 जागा लढायला तयार झाला याचे एकमेक कारण म्हणजे अमित शाह आपल्या पाठीमागे उभे होते. दोन महिने अमित शाह महाराष्ट्रात येऊन राहिले. निवडणुकीचे तंत्र अमित शाह यांनी शिकवले," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"आपल्यासोबत शिवसेनेने जी बेईमानी केली होती त्याला छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र आली. या काळात आमच्या पाठीशी भक्कमपणे अमित शाह उभे होते," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप, मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी संकलित केलेल्या ''विचार पुष्प'' पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष श्री आशिष शेलार हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.