अमित जोशी, झी मीडिया,मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे महाविकासआघाडी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीवेळी धनंजय मुंडे अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकासआघाडीच्या गोटातील चिंता वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, वर्षा गायकवाड, सुनील केदार आणि अस्लम शेख हे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता या मंत्र्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
मात्र, काही मंत्र्यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या माहितीनुसार, अजून कोणीही क्वारंटाईन झालेले नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम ध्यानात ठेवून बैठकीवेळी सर्व मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसले होते. तरीही कोणत्याही मंत्र्याला कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यास त्यांना तातडीने चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तर धनंजय मुंडे यांची प्रकृतीही उत्तम आहे. त्यांना केवळ श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटात ठाकरे काका-पुतण्या वाढदिवस साजरा करणार नाहीत
धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यापैकी पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे आज रूग्णालयात दाखल होणार आहेत. मुंडे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरानाची लागण झाली आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.