कल्याण रेल्वे स्थानकावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; फेरीवाल्यांना अर्वाच्य शिवीगाळ

उच्चभ्रू कुटुंबातील या तरुणीने रस्त्यावर अक्षरश: हैदौस घातला. 

Updated: Sep 24, 2018, 08:29 PM IST
कल्याण रेल्वे स्थानकावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; फेरीवाल्यांना अर्वाच्य शिवीगाळ title=

ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणीने धिंगाणा घातला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील टपरी चालकाने सिगरेट न दिल्यामुळे या तरुणीने त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच त्याच्या सामानाची फेकाफेक केली. यानंतर तरुणीने तेथील एका रिक्षावाल्याशीही हुज्जत घातली. 

या घटनेनंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले. मात्र, तिला समज देऊन सोडून देण्यात आले. कोपर परिसरात राहणारी ही तरुणी एका उच्चभ्रू कुटुंबातील असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली. रविवारी रात्री ती कल्याणला एका मैत्रिणीकडे पार्टी करण्यासाठी आली होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील टपरीवर सिगरेट घेण्यासाठी आली. 

टपरीचालकाने सिगरेट द्यायला नकार दिल्यामुळे ही तरुणी संतापली. तिने टपरीचालकाला थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने आजुबाजूच्या लोकांनी हस्तक्षेप केला नाही. अखेर एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन या तरूणीला पोलीस ठाण्यात नेले. तरुणीच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासमोर तिला समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र, या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल पुन्हा एका प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.