उद्धवजींसोबतची मैत्री कायम आहे - देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही, असे  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

Updated: Dec 7, 2019, 09:41 PM IST
उद्धवजींसोबतची मैत्री कायम आहे - देवेंद्र फडणवीस
संग्रहित छाया

मुंबई : भाजप - शिवसेनेचे (BJP - Shiv Sena ) सहकार येऊ शकलेले नाही. जनतेने आम्हाला (युती) कौल दिला होता. हा जनमताचा अपमान आहे. आता नवीन सरकार आले आहे. त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा आहे. या सरकारला थोडा वेळ देणार आहे. जर त्यांनी त्यानंतरही कामे केली नाही तर त्यांना धारेवर धरले जाईल. हे तीन पक्षांचे सरकार आहे. ते किती दिवस चालेल ते माहीत नाही. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही. तसेच उद्धवजी यांनी कोठेही तोडण्याची भाषा केलेली नाही. किंवा मीही काही भाष्य केलेले नाही. आमच्या दोघांच्यामध्ये कोणतीही भींत नाही. त्यामुळे ही मैत्री पुढे कायम राहिल, असे  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

मी सरकारला काही वेळ देणार - फडणवीस

राजकीय सत्तासंघर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतली. या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी सर्वबाबींवर भाष्य केले. सध्या राज्यात नवीन सरकार आहे. तसेच माझे मित्र आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे मी या नव्या सरकारला काही वेळ देणार आहे. त्यांनी चांगले निर्णय घेतले तर त्याचे स्वागत असेल. उद्धवजी माझे मित्र असले तरी त्यांनी चुकीचे निर्णय घेतले तर मी त्यांच्यावर टीका जरुर करणार, असे ते म्हणालेत.

 देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुलाखतमधील ठळकबाबी -

- मी अजित पवार  (Ajit Pawar) यांच्याकडे गेलो नव्हतो. तेच आमच्याकडे आलेत. अजित पवार यांनी मला सांगितले की, आम्ही शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेससमवेत (Congress) तीन पक्षांचे सरकार चालवू शकत नाही. आणि म्हणूनच आपण एकत्रितपणे सरकार स्थापन केले पाहिजे. शरद पवार यांनी सरकार स्थापण्यासाठी सर्व काही केले आहे, असेही मला अजितदादांनी सांगितले. आणि काकांची परवानगी आहे, असे ते म्हणालेत आणि म्हणून आम्ही एकत्र सरकार स्थापन केले. आता ते बरोबर की चूक हे नंतर निर्णय स्पष्ट होईल.

- राष्ट्रवादीचे (NCP)  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल जे  माध्यमांशी बोलत आहेत, त्याबाबत वेळ आल्यावर आम्ही त्यांना उत्तर देऊ.

- माझ्याबरोबर सरकार बनवण्यापूर्वी, अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य आमदारांनी माझे बोलणे करुन दिले होते. 

- भाजप (BJP) कधीही कोणाशीही डील करत नाही. जर आम्हीला डील करायचे होते तर आम्ही कोणत्यातही पक्षाशी करुन अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर सहमती दर्शविली असती. मग आम्ही सरकार स्थापन केले असते.

- आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहे. त्यांची आणि माझी मैत्री कायम आहे. त्यांनी कुठे म्हटलेले नाही तसेच मीही काही बोललेलो नाही. मैत्रीचे संबध जसे होते तसे आहेत. आमच्यात कोणतीही भिंत उभी राहिलेली नाही.

- विकास कामे थांबली तर रोजगारही उपलब्ध होणार नाही. बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पात अत्यल्प व्याजदराने कर्ज मिळाले आहे. मला वाटत नाही की हे सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवेल, परंतु मला असे वाटते की अशा परिस्थितीत विकास कामे रद्द करण्याचे वातावरण निर्माण करणे हा चुकीचा संदेश दिला जात आहे.

- उद्धव ठाकरे सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देत आहे. एक नवीन सरकार आहे, म्हणून आम्ही या सरकारला वेळ देऊ. परंतु वेळ दिल्यानंतरही जर सरकारने विकासकामे केली नाही तर आपण नक्कीच सरकारला धारेवर धरु.

- भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही. ही मीडिया निर्मितीची बातमी आहे. आमच्या पक्षात ओबीसी आणि सर्व जातींच्या लोकांना समान प्रतिनिधित्व मिळाले आहे. पंतप्रधान मोदीजी हे देखील ओबीसी जातीचे आहेत.

- हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. राष्ट्रवादीचे कोणाशीही जमते. ते कुठेही जाऊ शकतात.