मुंबई : Ganpati Festival : गणेशोत्सव काळात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विना मास्क (Without mask) फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क (Mask) लावणे गरजेचे आहे. जर आपण मास्क लावला नाही तर आपल्यावर मुंबई पोलीस देखील कारवाई करू शकतात, हे लक्षात घ्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत पालिका क्लीन-अप मार्शल विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. पालिकेनेही जय्यत तयारी केली आहे.
आता मुंबई पोलीसदेखील अशा प्रकारची कारवाई करत आहेत. मात्र, गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी अधिकच्या टीम बनवत विना मास असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहेत. मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशा प्रकारचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी गणेशोत्सवावर गेल्या वार्षीप्रमाणेच सरकारने निर्बंध कायम ठेवले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कायदा - सुव्यवस्था सांभाळण्यापेक्षा कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देणे हे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी चाचपणी सुरु केली आहे.
गणेश उत्सव मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच मुंबईतील 13 विभागांमध्ये प्रत्येकी एक अशी 13 पोलिसांची पथके तयार करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई महापालिकेचे वार्ड नुसार नंबर टाकलेले क्लिन मार्शल सज्ज असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सगळ्यांनीच सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पालिका आणि पोलिसांच्यावतीने करण्यात येत आहे.