कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना अटक

 कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रवी पुजारीने त्याच्या हस्तकाच्या डोक्यावरचा हात काढून घेतल्यानंतर थेट रवी पुजारीवरच हल्ला करण्याचा त्याचा कट होता.

Updated: Dec 6, 2018, 08:36 PM IST
कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना अटक

मुंबई : कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रवी पुजारीने त्याच्या हस्तकाच्या डोक्यावरचा हात काढून घेतल्यानंतर थेट रवी पुजारीवरच हल्ला करण्याचा त्याचा कट होता.

सादिक इब्राहिम बंगाली आणि धवल देवरमानी हे दोघे गुन्हे शाखेच्या तावडीत आहे. या दोघांना चार पिस्तुलं आणि २९ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. सादिक हा रवी पुजारीचा शुटर आहे. २००६ साली निर्माता महेश भट यांच्या कार्यालयावर गोळीबार, लोणावळा दुहेरी हत्याकांड आणि नवी मुंबईतले शिवसेना नगरसेवक देविदास चौगुलेंची हत्या अशा गुन्ह्यांमध्ये सादिक आरोपी आहे. 

रवी पुजारीच्या इशाऱ्यावर सादिकने अनेक हत्या, अपहरणं केली. २००८ साली रवी पुजारीच्या इशाऱ्यावर शिवसेना नगरसेवक देविदास चौगुलेची हत्या घडवून आणल्याचा आरोप सादिकवर आहे. मात्र हत्येसाठी ५० लाख रूपयांच बोलणं ठरलेलं असताना पैसे देणं तर सोडा रवी पुजारीने अटक घडवून आणली आणि सादिक तुरुंगात असताना कुटुंबाची देखभाल केली नाही, असं सादिकचं म्हणणे आहे. त्यामुळे सादिक रवी पुजारी आणि त्याच्या खबऱ्यांना उडवण्याच्या बेतात होता. 

सादिक हा नवीन गॅंग सुरू करण्याच्या तयारीत होता आता या गॅंगच्या निशाण्यावर कोण होते आणि त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.