रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेत लुटारु प्रवाशांचं पाकीट, सामानावर डल्ला मारतात.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 11, 2017, 05:20 PM IST
रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत  title=
File Photo

मुंबई : मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेत लुटारु प्रवाशांचं पाकीट, सामानावर डल्ला मारतात.

लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांना लुटणाऱ्या एका महिला चोराला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव अश्विनी माळवदे असं असून तिच्यावर मुंबई, नाशिक, हैदराबाद येथे असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे.

अश्विनी माळवदे ही लोकलमध्ये चढायची आणि त्यानंतर गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसुत्र, पर्स लंपास करत असे. रेल्वेतील महिला प्रवाशांना काही कळण्याअगोदरच अश्विनी फरार झालेली असायची.

रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर अश्विनीने सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून तिच्याकडून लाख रुपयांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.

महिला रेल्वे प्रवाशांचे कधी मंगळसुत्र, कधी पर्स तर कधी मोबाईलवर डल्ला मारला जात असे. आरोपी अश्विनी माळवदे चोरी करत असे त्यानंतर आपल्या मुळगावी परत जात असे. 

रेल्वे पोलिसांनी अशा प्रकारे केली कारवाई

गर्दीच्या वेळी चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर जीआरपीने रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये एक महिला संशयितरित्या फिरताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अश्विनीला बेड्या ठोकल्या.