मुंबईत उद्याही मुसळधार, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. 

Updated: Aug 5, 2020, 08:05 PM IST
मुंबईत उद्याही मुसळधार, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. तसंच मुंबई महापालिकेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्यादेखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते  आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून, कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे. 

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद

दरम्यान मुंबईप्रमाणेच कोल्हापुरालाही मुसळधार पावसाने झोडपलं आहे. कोल्हापूरच्या परिस्थितीचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच अतिरिक्त मदत लागल्यास तात्काळ संपर्क करायलाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम