मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्याचा सोपस्कार भाजपच्या दोन दिवसीय राज्य परिषदमध्ये पार पडला. आता प्रदेशाध्यक्ष त्यांची नवी टीम निवडतील. पण यानिमित्ताने भाजपमधल्या नाराज आणि डावलेल्या नेत्यांना काय जवाबदारी दिली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
सध्याची परिस्थिती बघता भाजपसमोर आव्हानांची भली मोठी यादी आहे. भाजपला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजातील त्रुटी शोधाव्या लागणार आहेत. यासाठी प्रदेश कार्यकारिणीत समतोल राखावा लागेल. याशिवाय, एप्रिल महिन्यातल्या विधानपरिषद निवडणुका लक्षात घेता पक्षातल्या नाराजांची वर्णी लावण्याचे आव्हानही चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असेल.
विशेषतः विधानपरिषद निवडणूक ही भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे अशा पक्षातल्या नेत्यांची तर हर्षवर्धन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, मुन्ना महाडिक, वैभव पिचड या आयारामांची नावे विधानपरिषदेसाठी रिंगणात आहेत.
सध्या भाजप सत्तेपासून दूर असल्याने कार्यकर्त्यांची फळी कायम ठेवण्याचे शिवधनुष्यही पाटील यांना पेलावे लागणार आहे. जेणेकरून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता कायम ठेवता येईल. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. २५ फेब्रुवारीपासून भाजपच्या आंदोलनांची सुरुवात होणार आहे.