...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा

राष्ट्रीय पातळीवर सारेजण ICMR ने आखून दिलेले निकष पाळत आहेत. 

Updated: Apr 17, 2020, 07:21 PM IST
...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा title=

मुंबई: राज्य सरकारने COVID-19 ची तपासणी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आखून दिलेल्या निकषांनुसारच करावी. अन्यथा आगामी काळात राज्यात कोरोनाचा धोका वाढेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी ICMR ने आखून दिलेल्या निकषांप्रमाणेच कोरोनाच्या चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे.

टेन्शन पुन्हा वाढलं; धारावीत कोरोनाची शंभरपार मजल

राज्य सरकारने या निकषांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कृत्रिमरित्या कमी दिसेल. मात्र, प्रत्यक्षात यामुळे कोरोना पसरण्याचा धोका आणखी वाढेल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 
राष्ट्रीय पातळीवर सारेजण ICMR ने आखून दिलेले निकष पाळत आहेत. मुंबई महानगरपालिकेने या निकषांमध्ये बदल करण्याची गरज नव्हती. पालिकेने १२ एप्रिल रोजी एक आदेश काढला. यामध्ये अतिजोखमीच्या (हायरिस्क) संपर्काची तपासणी करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. 

मोठी बातमी : ३ मे पर्यंत देशातील रेल्वे सेवा बंदच; मुंबई लोकलही यार्डात

मात्र, ICMR च्या निर्देशांनुसार अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील, परंतू तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे, अशांची संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ व्या दिवसापर्यंत एकदा तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या नव्या नियमानुसार संबंधित व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तरच त्याची तपासणी करता  येते. परंतु, चीनमध्ये ४४ टक्के केसेसमध्ये लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडूनच कोरोनाच संसर्ग झाला, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी पालिकेची ही रणनीती भविष्यात घातक ठरू शकते. त्यामुळे आपण मुंबई महानगरपालिकेला ही रणनीती बदलण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.