आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: कल्याण एपीएमसीमधील बोजवाऱ्याबाबत 'झी २४ तास'ने दाखवलेल्या वृत्तानंतर एपीएमसी प्रशासन अखेर जागे झाले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा दैनंदिन भाजीपाला बाजार पाच दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कोरोना लॉकडाउन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा होऊ नये यासाठी अन्नधान्य आणि भाजीपाला मार्केट सुरु ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला आणि किराणा मालाचा बाजार सुरु ठेवण्यात आला आहे. मात्र, या बाजारात गर्दी टाळण्यासाठी फक्त घाऊक व्यवसाय करण्यास तसेच मर्यादित व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत बाजार समितीच्या आवारात किरकोळ व्यापार देखील सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली होती. याबाबत 'झी २४ तास'ने वृत्त प्रसारित करत प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.
अरे देवा... कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण
बाजार समितीमधील गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती निर्माण झाल्याने तसेच पालिका हद्दीत वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव पाहता बाजार समितीच्या आवारातील दैनंदिन भरणारा भाजीपाला बाजार शनिवार २७ जूनच्या संध्याकाळ पासून ते बुधवार १ जुलै पर्यत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दरम्यान या कालावधीत सकाळी ५ ते संध्याकाळी ५ या कालावधीत अन्नधान्य, कांदा, बटाटा, फळे व गुरांचा बाजार नियमितपणे सुरु राहील, असे समितीच्या वतीने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.