लता मंगेशकरांना वाढदिनी राज ठाकरेंच्या अशा शुभेच्छा

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.  राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 28, 2017, 09:49 AM IST
लता मंगेशकरांना वाढदिनी राज ठाकरेंच्या अशा शुभेच्छा  title=
फोटो सौजन्य : राज ठाकरे यांच्या फेसबूक पेजवरुन

मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म  २८ सप्टेंबर १९२९ झाला. त्या देशाच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांचा भारत सरकारने सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्‍न' देऊन गौरव केलाय. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस, अशा शब्दात त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे.

लतादीदींचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये झाला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. 

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

 लता मंगेशकर हे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये  १९७४ ते  १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत ५० हजार गाण्यांची नोंद आहे.

लतादीदी यांनी नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (१९४२) या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. त्यानंतर  १९४५ मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी उस्ताद अमानत अली खॉ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून भारतीय शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामे ( १९४६) या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले.