लोकसभेच्या निकालांनी महायुतीत टेन्शन, राज्यातील 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात मविआची आघाडी

Loksabha Maharashtra Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 30 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारलीय. तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. लोकसभेच्या या निकालांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 6, 2024, 02:47 PM IST
लोकसभेच्या निकालांनी महायुतीत टेन्शन, राज्यातील 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात मविआची आघाडी title=

Loksabha Maharashtra Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला (BJP) चांगलाच धक्का बसलाय. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित आघाड्यांची मोठी पीछेहाट झाल्याचं दिसतंय. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं तर दुसरीकडे मविआची (Mahavikas Aghadi) मात्र 30 जागांवर विजय मिळाला. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाल्याचं दिसून येतंय. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कायम राहिल्यास महायुती पुन्हा सत्तेत येणं कठीण असल्याचं दिसतंय. आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 150 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला जास्त मतं मिळाली आहेत. 

येत्या 4 महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्यायत. त्यावेळी मतदारांचा कौल असाच राहिल्यास मविआला 150 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो. तर  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल 125 जागांपर्यंत जाऊ शकते. राज्यात बहुमताचा जादूई आकडा 145 एवढा आहे. त्यामुळे 150 जागांवर विजय मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत राज्यात मविआ सहजपणे सत्तेत येऊ शकते असंच लोकसभेच्या आकडेवारीवरुन दिसतंय.

नरेंद्र मोदी यांनी घेतला महाराष्ट्राचा आढावा
महाराष्ट्रातील भाजपाच्या पिछेहाटीचा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही आढावा घेतला आहे. एनडीएच्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रातील पराभवाची कारणं जाणून घेतली. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. मोदींनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली. एकनाथ शिंदे,  प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठं फटका बसला, याबाबत मोदींशी चर्चा केली. राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती मोदींना दिली. राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याची देखील सांगण्यात आले. विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. 

नाशिकमध्ये महायुतीताल वाद चव्हाट्यावर
नाशिकमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हेमंत गोडसेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडल्याचं दिसून येतंय. निवडणूक प्रचारात भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी काम केलं. तसचं राष्ट्रवादीच्याही काही पदाधिकाऱ्यांनी केलं. मात्र काहींनी काम केलं नाही, हे जनतेला माहित आहे, अशी टीका त्यांनी केलीय. यावरुन हेमंत गोडसेंच्या टीकेचा सूर भुजबळांकडे तर नाही ना असा सवाल विचारला जातोय. त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी आणि भुजबळांवर निशाणा साधला.

अमरावतीतही वाद
अमरावतीत नवनीत राणांच्या पराभव झाल्यानंतर आमदार प्रवीण पोटेंनी भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आधीच नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, अशी  स्थानिक भाजपची मागणी होती. मात्र तरीही स्थानिकांना झुगारुन राणांना उमेदवारी देण्यात आली. याचा मोठा फटका राणांना बसलाय अशी चर्चा आहे.