मुंबई : पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक जाहीर मुलाखत दिली. मातोश्रीशी जोडली गेलेली नाळ असो किंवा वर्षावरील वास्तव्य. इथपासून त्यांनी बंडखोरी झाली, पण नेमकं इथं काय चुकलं? या प्रश्नाचंही उत्तर दिलं. तसंच यावेळी त्यांनी आपल्या मुलाखतीत भाजपवरही (BJP) जोरदार टीका केली.
याबाबत पत्रकारांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना विचारला असता फडणवीस यांनी बोचरी टीका केली. मी फिक्स मॅच पाहात नाही, मी लाईव्ह मॅच बघत असतो, खरी मॅच बघतो, ही फिक्स मॅच आहे त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची असा टोला लगावला.
विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता, संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातल्या कामांवर स्थगिती आहे, पण अशी कुठलीही स्थगिती नाही. दादांसारख्या व्यक्तींनी तरी असा आरोप करताना बघायला हवं होतं, फाईलवर काय लिहिलं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे यांच्या एकट्या पर्यटनविभागाबाबत नाही तर एकूणच सरकराचं समर्थन संपल्यानंतर चारशे जीआर काढण्यात आले, आणि पाच पट पैसे वाटून टाकण्यात आले. बजेटचाही विचार करण्यात आला नाही. अशी प्रकारे काम सुरु ठेवलं तर सरकारच्या तिजोरीवर त्याचा फार मोठा परिणाम होईल, त्याचा रिव्ह्यू केला जाईल असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
राज्यातील पावसाळी परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे, त्यावर आधारीत निर्णय आम्ही निश्चित करु तसंच अजित पवार यांच्या सरकारने जो काही निर्णय घेतला होता त्यापेक्षा अधिक चांगला निर्णय आम्ही घेऊ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.