'मीच त्यांना म्हणालो की आपण...'; CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी दिलं उत्तर

Ajit Pawar : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 18, 2024, 04:21 PM IST
'मीच त्यांना म्हणालो की आपण...'; CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी दिलं उत्तर title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाडीतील दाटीवाटीत बसलेला व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पोस्ट केला होता. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी, असे कॅप्शन सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. आता अजित पवार यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी आज मुंबईतल्या अजित पवार गटाच्या महिला मेळाव्यात हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या कारचालकाने काढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालकाच्या बाजूच्या सीटवर येऊन बसताना दिसतात. मात्र शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच मागच्या सीटवर मध्यभागी चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहेत. त्यानंतर बावनकुळेंच्या उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस येऊन बसले. त्यानंतर डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कारमध्ये शिरले. शेवटी मंत्री गिरीश महाजन हे अजित पवार यांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अजित पवार अजून उजवीकडे सरकतात. मात्र आता एका बाजूने फडणवीस दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे आणि अजित पवार फोर्थ सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसतात. 

काय म्हणाले अजित पवार?

"पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोण कुणाच्या गाडीत बसणार, कुठे बसणार हे चेक होत असतं. पुढे गाडीचा चालक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मागे मी स्वत:, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बसणार होतो. पण ताफा एकदम पुढे गेल्याने आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना बसायला गाडी नसल्याने मीच त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत," असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"जे व्हिडीओ व्हायरल करत आहेत त्यांची मला कीव करावीशी वाटते. विकासाचं बोलुयात ना आपण. गाडीत किती बसले, कोण बसले. अरे दाटीवाटीचा त्रास जे गाडीत बसले त्यांना होईल ना. तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे?" असाही सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.