आधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?

राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.

Updated: Jun 13, 2023, 08:42 PM IST
आधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय? title=

विजय सुर्वे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी असणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या महाराष्ट्रात नाही आहेत. उद्धव ठाकरे कुटुंबासह देशाबाहेर असतानाच पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे. शरद पवार-मुख्यमंत्री भेट झाल्यानंतर लगेचच उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्यात नेमकं घडतंय काय असा प्रश्न सर्वांना पडलाय.

शरद पवार-मुख्यमंत्री भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत पवारांनी शिंदेंना मराठा मंदिर संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. पवारांसोबत सदिच्छा भेट झाली असून कोणतीही राजकीय भेट झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

शरद पवारांचं ट्विट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. 'मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.  यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य आणि कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

पवार-अदानी भेट
मुख्यमंत्री-शरद पवार यांच्याभेटीनंतर काही वेळातच उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हरओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अदानी गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्यानंतर लगेचच अदानी पवारांची भेट घेण्यासाठी गेल्यामुळे या दोन भेटींमध्ये संबंध जोडले जात आहेत.