Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार (NCP MLA) फुटले असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी असल्याचा दावा शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिंदे गटाने उठाव केला नसता तर कदाचित राष्ट्रवादी (NCP) भाजप (BJP) सोबत गेली असती असा खळबळ जनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र अधिवेशन संपले पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहतोय, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम राहावा आणि आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे
अमोल मिटकरींचा वेगळाच दावा
दुसरीकडे, राज्यात नवीन समीकरण उदयाला येण्याची शक्यता असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलंय. त्याचं कारण ठरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची घेतलेली भेट. शिंदे आणि पवार भेटीमागे काही राजकारण दिसतंय. आगामी काळात राज्यात वेगळं चित्र दिसू शकेल असं वक्तव्य मिटकरींनी केलंय. तेव्हा राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार का याचीच आता चर्चा रंगतेय. शिंदे आणि पवार भेटीमागे नेमकं काय दडलंय यावरच आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.