Ramdas Kadam : ज्यावेळी शिवसेनेचा (Shivsena) इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी आपल्याच बापाशी बेईमानी करणारी औलाद म्हणून, गद्दार म्हणून उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव इतिहासात लिहिलं जाईल अशी जरही टीका माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. खोके घेण्याचं काम कोणी केलं असले, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना इतरांना खोके आणि गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
कोकणी माणूस शिंदे गटाच्या पाठिशी
शिवसेनेत आम्ही 56 वर्ष काम केलं, शेकडो केसेस अंगावर घेतल्या, पण शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर शिवसेनेत आमचं खच्चीकरण झालं, यांना वाघ नको तर यांना शेळ्यामेंढ्या हव्यात असा टोला रामदार कदम यांनी लगावला. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. अफझलखान जसा दिल्लीतून चालून आला होता, तसे उद्धव ठाकरे माझ्यावर चालून आले, पण काय झालं त्यांच्या दहा पटीने मोठी सभा मी घेतली. 55 हजार लोकं बसायला जागा नसल्याने परत गेले असा पोलीस रिपोर्ट आहे. कोकणी माणूस हा एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठिशीच उभा असल्याचं सिद्ध केलंय, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रातून लोकं आणली होती. पण दहा ते 15 हजारांच्यावर लोकं जमवता आली नाहीत. आता एकट्याने लढणं जमणार नसल्याचं कळल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सभा घेत असल्याची टीकाही रामदास कदम यांनी केलीय.
आदित्य ठाकरेंवर टीका
यावेळी रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. काका काका म्हणून दोन वर्ष माझ्या केबिनमध्ये येऊन बसत होता, माझं खातं समजून घेत होता. पण मला काय माहित की माझंच खातं घेईल. केबिनमध्ये आल्यावर हे काय ते काय विचारुन घ्यायचा दोन वर्ष सर्व खातं समजून घेतलं आणि मग 'काका आऊट साहेब इन' अशा शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका केली.
रामदास कदम यांना मंत्रीमंडळातून काढलं आणि हे स्वत: मुख्यमंत्री बनले आणि मुलाला कॅबिनेट मंत्री बनवलं, असं कधी झालं होतं का. शिवसेनाप्रमुखांनी जो डोलारा उभा केला होता, तो खाली पाडण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गद्दार आहेत, नेत्यांच्या पाठिमागे खंजीर खुपसणारी तुमची औलाद आहे. आम्ही गद्दार नाही आम्ही निष्ठावंत असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
शिवसेनाप्रमुख आणि भगव्या झेंड्याची साथ रामदास कदम कधीच सोडणार नाही, असंही रामदास कदम यांनी म्हटलंय.