'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर

जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

Updated: Apr 27, 2023, 06:43 PM IST
'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर title=

Maharashtra Politics : मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली होती. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत. माझ्या पाठीत खंजीर खुपसला असून, त्याचा सूड मी घेणारच अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. आपण जो प्रसाद देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील असाही इशारा दिला. 

मुख्यमंत्री शिंदे यांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जशासतसं उत्तर दिलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय 'काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. 

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की' असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

बारसू आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार आहेत. बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिलीय. मात्र सरकारनं पोलिसांनीची छावण्या दूर करून लोकांशी चर्चा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. एकीकडे बारसूतल्या रिफायनरीला होणारा विरोध शमवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. तर दुसरीकडे स्थानिकांनी उद्या महमोर्चाची हाक दिलीय. स्थानिकांच्या या मोर्चाला ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय. उद्या सकाळी 10 वाजता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत या महामोर्चात सहभागी होणार आहेत.