मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?

Maharashtra Rain : राज्यातून नाहीसा झालेला पाऊस परतताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे बळीराजाला.   

सायली पाटील | Updated: Sep 12, 2023, 07:05 AM IST
मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?  title=
(छाया सौजन्य- स्कायमेट) Maharashtra Rain Mumbai rainfall to take backfoot know latest updates

Maharashtra Rain : जवळपास महिना दीड महिना राज्यातून नाहीसा झालेला पाऊस सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याअखेर परतला आणि एकच कल्ला झाला. मागील काही दिवसांमध्ये बरसणारा पाऊस पाहता आता हा पाऊस गणपती गाजवणार अशीच शक्यता अनेकांनी व्यक्त केली. पण, असं असतानाच नव्या आठवड्याची सुरुवात झाली आणि पावसानं पुन्हा एकदा दडी मारत त्याचे खरे रंग दाखवण्यात सुरुवात केली. 

मागील 24 तासांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये बरसलेल्या तुरळक सरी वगळता शहरात पावसाची हजेरी पाहायला मिळालेली नाही. दुपारच्या वेळी शहरातील नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामनाही करावा लागत आहे. पुढील किमान तीन ते चार दिवसांसाठी शहरात हीच परिस्थिती कायम राहिल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून, शहरातील काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा पाहायला मिळणार आहे. 

पावसाची वाट बदलली.... 

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्यामुळं मध्य प्रदेश आणि लागून असणाऱ्या भागावर पावसाची कृपा होताना दिसणार आहे. ज्यामुळं पावसानं त्याची वाट काहीशी बदलली असल्याचा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. 16 सप्टेंबरच्या सुमारास मुंबई आणि कोकणामध्ये पावसाची हजेरी पाहता येणार आहे. तर, 17 आणि 18 सप्टेंबरला शहराला अतिमुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात पावसाची काय स्थिती? 

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा कमी झालेलं असलं तरीही 13 सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा एकदा जोर धरताना दिसणार आहे. पुढील काही दिवस राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. थोडक्यात गणेशोत्सवादरम्यान पावसाचीही उपस्थिती असेल ही बाब नाकारता येत नाही. 

हेसुद्धा वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या

 

देशातील हवामानाचा आढावा... 

पुढील 24 तासांसाठी देशातील हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती देत स्कायमेटनं उत्तर प्रदेश, ओडिशा, अंदमान निकोबार, मध्य प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग या भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तर, लक्षद्वीप, तेलंगणा, उत्तराखंड आणि हिमाचरमध्येही पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवली आहे.