Raj Thackeray : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. रवींद्र नाट्यमंदीरात झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगितला. एकाने मला विचारलं काय झालं. मी म्हटलं हिप रिप्लेसमेंट ऑपरेशन झालं. हार्ट रिपलेसमेंट असते. किडनी रिप्लेसमेंट वगैरे वगैरे. एकाने सांगितलं हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार. मी म्हटलं कसं दिसेल ते. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं समर्थन
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्मांचं (Nupur Sharma) समर्थन केलंय. नुपूर शर्मा यांनी माफी मागायची काही गरज नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. झाकीर नाईक आपल्या हिंदू देवदेवतांचा अवमान करतो, त्यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करतो, पण त्यावर कोण काही बोलत नाही, झाकीर नाईकला कोणी माफी मागायला लावत नाही. औवेसी आपल्या देवी-देवतांच्या नावावरुन हेटाळणी करतात, असं सांगत राज ठाकरे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचं समर्थ केलं.
शिवसेनेतून गद्दारी केली नाही
आपण शिवसेनेतून गद्दारी गेली नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. मी सत्तेसाठी शिवसेनेतून बाहेर पडलो नाही, मी बाहेर पडून वेगळा पक्ष काढला, आणि हे सर्व मी बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केलं होतं, शिवसेनेतून बाहेर पडताना मी बाळासाहेबांकडे गेलो त्यांनी मला प्रेमाने अलिंगन दिलं आणि आता जा म्हणून सांगितलं, असं राज यांनी सांगितलं.
राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो
मनसे (MNS) आंदोलनं अर्धवट सोडतो अशी टीका होते, यावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं आहे, राज्यातील 65 ते 67 टोलनाके आपण बंद केलं. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोल नाके बंद करतो असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.