.... तर तुम्हाला 'खासगी हॉस्पिटलचे तारणहार' म्हणून पुरस्कार देऊन सत्कार करू; मनसेचा आयुक्तांना इशारा

शहरातील खासगी हॉस्पिटलची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Updated: Sep 4, 2020, 05:15 PM IST
.... तर तुम्हाला 'खासगी हॉस्पिटलचे तारणहार' म्हणून पुरस्कार देऊन सत्कार करू; मनसेचा आयुक्तांना इशारा title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, नवी मुंबई:  नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलच्या लुटमारी विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली पहावयास मिळाली. यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी लेखी निवेदन दिले. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्यांची आर्थिक लूट करत असलेल्या खाजगी हॉस्पिटलवर येत्या सात दिवसांत तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार देण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना यावेळी दिला. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे वाशीतील 'हिरानंदानी फोर्टिस' हॉस्पिटलच्या मुजोरी विरोधात यावेळी तक्रारी केल्या.

दरम्यान, शहरातील खासगी हॉस्पिटलची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक खाजगी हॉस्पिटल शासन निर्णयाला न जुमानता रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पनवेल, मीरा भाईंदर मनपाने अश्या मुजोर हॉस्पिटलला दणका दिला आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिका खाजगी हॉस्पिटलवर मेहेरबान असल्याचा आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून करण्यात आला. नवी मुंबई मनपाने अद्याप
एकाही खाजगी कोविड हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला नाही, एकाही खाजगी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली नाही, तसेच खाजगी हॉस्पिटलने रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिल अद्यापपर्यंत नातेवाईकांना परत केले नाही असे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केलेले आहे.

यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, उपशहर अध्यक्ष  विनोद पार्टे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, शहर सचिव विलास घोणे, शहर सचिव रुपेश कदम, शहर सहसचिव दिनेश पाटील, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, रोजगार - स्वयं रोजगार विभागाचे शहर संघटक सनप्रित तुर्मेकर, शारीरिक सेनेचे शहर संघटक सागर नाईकरे, मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, मयुर चव्हाण, शाखा अध्यक्ष विराट शृंगारे, मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार - स्वयं रोजगार विभागाचे उपशहर संघटक अनिकेत पाटील, किरण काकेकर, महाराष्ट्र सैनिक प्रतिक खेडेकर हे उपस्थित होते.